जयपूर, 20 मे : राजस्थान रॉयल्सच्या संघाने पंजाब किंग्जला हरवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयाचा शिल्पकार यशस्वी जैसवाल ठरला. त्याने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना एक बाजून लावून धरली. यशस्वीने 36 चेंडूत 56 धावा केल्या. यासोबत आयपीएलमधला 15 वर्षे जुना विक्रम मोडला. यंदाच्या हंगामात यशस्वीने 600 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो यंदाच्या हंगामातला एकमेव भारतीय आहे. तसंच या कामगिरीच्या जोरावर एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडूही ठरला आहे.
देशासाठी राष्ट्रीय संघात पदार्पण न केलेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू म्हटलं जातं. यशस्वी जैसवालला अद्याप तरी भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळालेली नाही. सध्या आयपीएलमध्ये त्याची दमदार कामगिरी सुरू असून त्याने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. यंदाच्या हंगामात त्याने 14 सामन्यात 48 च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकं आणि एका शतकाचाही समावेश आहे.
आयपीएलच्या इतिहासात 15 वर्षे जुना विक्रम यशस्वीने मोडला. ऑस्ट्रेलियाच्या शेन मार्शने एका हंगामात 616 धावा केल्या होत्या. मार्श 2008 मध्ये आयपीएलवेळी अनकॅप्ड होता. आता यशस्वीने यंदाच्या हंगामात 625 धावा केल्या असून त्याने शॉन मार्शचा विक्रम मोडला. 15 वर्षे शॉन मार्शच्या नावावर हा विक्रम होता.
आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक स्ट्राइक रेटबाबत यशस्वी जैसवाल चौथ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल 183.13 स्ट्राइक रेटसह अव्वल स्थानी आहे. त्याने 2011 मध्ये आरसीबीकडून खेळताना ही कामगिरी केली होती. तर दुसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत असून त्याने 2018 च्या आयपीएल हंगामात 173.6 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळताना 168.8 च्या स्ट्राइक रेटने धावा करणारा एबी डिविलियर्स या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.