मुंबई, 9 मे : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सनने आरसीबीचा दारूण पराभव केला आहे. आरसीबीने दिलेलं 200 रनचं आव्हान मुंबईने 16.3 ओव्हरमध्येच पार केलं. सूर्यकुमार यादवने 35 बॉलमध्ये 83 रनची वादळी खेळी केली. सूर्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. सूर्यकुमारसोबतच नेहल वढेरा यानेही 34 बॉलमध्ये नाबाद 52 रन केले. इशान किशनने 21 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली. आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि विजयकुमार वश्यक यांनी 2-2 विकेट घेतल्या.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने सुरूवातीलाच आरसीबीला दोन धक्के दिले, पण फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. मॅक्सवेलने 33 बॉलमध्ये 68 आणि डुप्लेसिसने 41 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली. दिनेश कार्तिकने 18 बॉलमध्ये 30 रन केले. मुंबईकडून बेहरनडॉर्फने 3 विकेट घेतल्या, तर ग्रीन, जॉर्डन आणि कार्तिकेय यांना 1-1 विकेट मिळाली.
पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची झेप
या विजयासोबतच मुंबईने पॉईंट्स टेबलमध्येही मोठी झेप घेतली आहे. मॅचआधी आठव्या क्रमांकावर असलेली मुंबई आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मुंबईने 11 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या 12 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 11 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 10 पॉईंट्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.