जयपूर, 19 एप्रिल : आयपीएल 2023 ची आपली पहिलीच मॅच होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या राजस्थानला पराभवाचा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने या सामन्यात 10 रनने विजय मिळवला आहे. लखनऊने दिलेलं 155 रनचं आव्हान पार करताना राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 144/6 एवढा स्कोअर करता आला.
लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात चांगली झाली. जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी 11.3 ओव्हरमध्ये 87 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. पण यानंतर राजस्थानची बॅटिंग गडगडली. यशस्वी जयस्वालने 44, जॉस बटलरने 40 आणि पडिक्कलने 26 रनची खेळी केली. लखनऊकडून आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिसला 2 विकेट मिळाल्या.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि लखनऊला 154/7 वर रोखलं. काईल मायर्सने सर्वाधिक 51 रन केले, तर केएल राहुलने 39, पूरनने 29 आणि स्टॉयनिसने 21 रनची खेळी केली. राजस्थानकडून अश्विनने 2 तर बोल्ट, संदीप शर्मा आणि होल्डर यांना 1-1 विकेट मिळाली.
लखनऊविरुद्धच्या या पराभवानंतरही राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थानने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. लखनऊने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.