मुंबई, 14 मे : आयपीएल 2023 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरूवात होणार आहे, पण प्ले-ऑफची रेस आणखी कठीण झाली आहे. या मोसमात आतापर्यंत दिल्लीची एकमेव टीम प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे, तर इतर 9 टीममध्ये अजूनही कांटे की टक्कर सुरूच आहे. रविवारी दुपारी झालेल्या आरसीबी आणि राजस्थान यांच्यातल्या सामन्यात आरसीबीचा तब्बल 112 रननी विजय झाला, त्यामुळे आरसीबीच्या नेट रनरेटला बुस्टर डोस मिळाला आहे.
आरसीबीच्या या विजयामुळे मुंबईचं टेन्शन मात्र वाढलं आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर सध्या गुजरात पहिल्या, चेन्नई दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या, लखनऊ चौथ्या आणि आरसीबी पाचव्या क्रमांकावर आहेत. टॉपच्या पाच टीममध्ये एकट्या मुंबईचा नेट रनरेट हा मायनसमध्ये आहे.
टॉपच्या पाच टीमपैकी गुजरात, मुंबई, लखनऊ आणि आरसीबीच्या प्रत्येकी दोन मॅच तर सीएसकेची एक मॅच शिल्लक आहे. गुजरातचे 16, सीएसके 15, मुंबई 14, लखनऊ 13 आणि आरसीबीचे 12 पॉईंट्स आहेत. मुंबईने त्यांच्या उरलेल्या दोन पैकी एक मॅच गमावली आणि आरसीबीने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर दोन्ही टीमच्या खात्यात 16 पॉईंट्स होतील, ज्यामुळे आरसीबी प्ले-ऑफला पोहोचून मुंबईला बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राजस्थान आणि केकेआरच्या टीमही प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाल्या आहेत, कारण दोन्ही टीमनी 13 मॅच खेळून त्यांचे 12 पॉईंट्स आहेत. शेवटची मॅच जिंकली तरी त्यांच्या खात्यात जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होऊ शकतात, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीमना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. दुसरीकडे हैदराबादची अवस्थाही केकेआर आणि राजस्थानसारखीच आहे. हैदराबादचे 11 मॅचमध्ये 8 पॉईंट्स आहेत, त्यामुळे हैदराबादनेही उरलेल्या तीनही मॅच जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होतील.
पंजाबकडे 12 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत, त्यामुळे त्यांनी उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर तेदेखील 16 पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.