मुंबई, 08 मे : शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. लखनऊला तब्बल 56 धावांनी पराभूत करत गुजरातने विजयी घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात दोन बाद 227 धावा केल्या होत्या. तर लखनऊला 20 षटकात 7 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.
यंदाच्या आय़पीएलमध्ये गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले असून त्यांचे 16 गुण झाले आहेत. यासह गुजरातने प्लेऑफमध्ये आपलं स्थान जवळपास भक्कम केलं आहे. गुजरातला आता फक्त तीन सामने खेळायचे आहेत. या तीनही सामन्यात त्यांचा पराभव झाला तरच प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. तीन पैकी एक सामना जिंकला तरी ते सहज प्लेऑफमध्ये पोहोचतील. त्यांचे पुढचे सामने मुंबई, हैदराबाद आणि आरसीबी यांच्याविरुद्ध असणार आहेत.
IPL 2023 : राजस्थानचा हिरोच शेवटी ठरला व्हिलन, बटलरने टीमच्याच पायावर मारली कुऱ्हाड!
प्लेऑफमध्ये गुजरातचे स्थान निश्चित मानल्यास इतर तीन जागांसाठी 9 संघांमध्ये शर्यत आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि केकेआर यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. मुंबई, आरसीबी आणि पंजाब या संघांना उर्वरित सामने जिंकून 18 पॉइंट पर्यंत मजल मारता येईल. तर राजस्थान, हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स 16 पॉइंटपर्यंत पोहोचू शकतात. तर चेन्नई सुपर किंग्ज 19 आणि लखनऊला 17 पॉइंट मिळवता येऊ शकतात.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध हैदराबादने विजय मिळवल्याने ते अद्याप स्पर्धेत आहेत. हैदराबादने नवव्या तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहेत. पण त्यांचे प्रत्येकी 4 सामने शिल्लक आहेत. यात त्यांनी विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये त्यांना जागा मिळू शकते. राजस्थान, आरसीबी, मुंबई, पंजाब यांचे प्रत्येकी दहा सामने झाले आहेत. यात त्यांनी प्रत्येकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवून प्लेऑफ गाठण्याची संधी या संघांकडे आहे. यातही त्यांना जर-तरच्या समिकरणांवर अवलंबून रहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.