मागील खरीप हंगामात माहे नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३३ टक्के पेक्षा जास्त कोरडवाहू खरीप शेतपिकांसह इतर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्तांच्या वेदना जाणून घेत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच सततचा करण्यात आलेला पाठपुरावा याला अखेर यश आले आहे.यात पूर्व विदर्भासाठी शासनाने लेखा अनुदान २०२२ -२३ अंतर्गत ५३ कोटींची नुकसान भरपाई मदत जाहीर केली असून सदर अनुदानात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्याला ३० कोटीच्या मदतीचे शासन आदेश मिळाल्याने माजी मंत्री, आ. विजय यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
गतवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच कहर माजविला. यात पूर्व विदर्भातील बहुतांश लागवड क्षेत्रातील पिकांची ३३ टक्के पेक्षा जास्त कोरडवाहू खरीप पिकांची नासधूस तसेच जनावरांचा मृत्यू ,घरांची पडझड, झोपडी, जनावरांचे गोठे पूर्णतः नष्ट तथा अंशतः नुकसानग्रस्त झाले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारशा, मुल, वरोरा, सिंदेवाही, पोंभूर्णासह सावली या आठ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. शेतातील उभे पीक नष्ट झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे मोठे आभाळ कोसळले. अशा विदारक परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यावेळचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे समक्ष आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या मदत हाकेला धावून जात माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंबना न लावता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यास निर्देश प्रशासनाला दिले. सदर निर्देशावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी पंचनामे अंती २४ डिसेंबर २०१९ रोजी आयुक्त (कृषी)आयुक्तालय पुणे यांना जिल्ह्यातील झालेल्या नुकसाना बाबतचा अहवाल सादर केला. सदर अहवालावरून लेखा अनुदान २०२२-२३ नुसार विभागीय आयुक्त नागपूरच्या सहाय्यक संचालक ताळमेळ शाखे अंतर्गत १२ सप्टेंबर २०२२ चे पत्रानुसार पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांकरिता एकूण ५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक अंदाजे ३० कोटी रुपये नुकसान भरपाई निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला मिळवून देणे यामागे माजी मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या पाठपुराव्याचे फलित ठरले. जिल्ह्यातील गारपीटी व अवकाळी पाऊस यामुळे सर्वाधिक नुकसान सावली तालुक्यातील १११ गावातील १९३८७.७ एवढ्या मोठ्या प्रमाणातील लागवड क्षेत्राचे झाले असून बाधीत शेतकऱ्यांची संख्या २७४०० एवढी प्रचंड आहे.
अतिवृष्टी ग्रस्तांना वाढीव मदत द्या – आ.वडेट्टीवार
असमानी संकटातून निर्माण होणारी नापिकी तसेच महागाईनुसार शेती व्यवसायातील खर्च हे परवडण्यासारखे नसल्याने शेती व्यवसाय डबघाईला लागला आहे. यंदाचे वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाच्या मोबदल्यात शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने बळीराजाला जीवन जगणे अवघड झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याची माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.