पुणे, 14 मे : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून वडिलांचा अपमान केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाच्या मुलानेच ही हत्या घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने मित्रांच्या मदतीने हा खून केला. यासाठी जानेवारी महिन्यापासून कट रचला जात होता. तसंच गेल्या महिन्याभरात किशोर आवारे यांची रेकीही करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
किशोर आवारे खून प्रकरणात सुरुवातीला अटक केलेल्या चौघानी दिलेल्या माहितीनंतर आरोपी गौरव खळदेला अटक केली गेली. गौरव हा सिव्हिल इंजिनिअर असून तो स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांभाळात होता. किशोर आवारे यांची हत्या करणारा श्याम निगडकर हा गौरव खळदेचा मित्र होता. गौरव खळदे हा श्यामला वेळोवेळी आर्थिक मदत करत असे. याच मैत्रीखातर श्याम निगडकर आणि त्याच्या साथिदारांनी किशोर आवारे यांची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांचा अपमान झाला तिथेच मुलाने घेतला बदला
तुमच्या शहरातून (पुणे)
जानेवारीत रचला कट, महिन्याभरापासून रेकी
गौरव खळदे हा किशोर आवारे यांच्या हत्येचा कट जानेवारीपासून रचत होता. याशिवाय गेल्या महिन्याभरापासून किशोर आवारे यांची रेकी केली जात होती. अखेर तळेगांव नगरपरिषदेच्या कार्यालयात आवारेंना मारेकऱ्यांनी गाठलं आणि कोयत्याने वार करून गोळीबार केला.
वडिलांच्या अपमानाचा राग
माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरून आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडीत लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.
गोळीबार आणि कोयत्यानेही केले वार
किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी दोन वाजता तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात हत्या झाली. यावेळी हल्लेखोरांनी आधी गोळी झाडल्या. या गोळीबारात किशोर आवारे जागीच कोसळले. हल्लेखोर तेवढ्यावर न थांबता आवारे यांच्या डोक्यात कोयत्यानेही वार केले. यामुळे किशोर आवारे यांच्या चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.