वैष्णवी राऊत, मुंबई 15 मे : शुक्रवारी, 12 मे रोजी दुपार होता होता पुणे हादरलं. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसा ढवळ्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आधी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर कोयत्याने डोक्यावर वार करण्यात आले. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाने अनेक वळणं घेतली. आणि आता समोर आलंय की हत्या करणाऱ्याने ती ‘मैत्रीखातर’ केली. ‘मैत्रीसाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या वडिलांच्या अपमानाचा घेतलेला हा बदला आहे.’ नेमकं पुर्ण प्रकरण काय आहे? सुरूवात ते शेवट, अगदी मधल्या धागेदोऱ्यांसह जाणून घेऊया.
तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर 12 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास खळबळ उडाली. जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे मिटींग झाल्यावर कार्यालयातून बाहेर येताच दबा धरून बसलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने डोक्यात गंभीर वार केले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. आवारे यांना सोमाटणे फाटा इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं पण वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केलं.
आमदारांवर हत्या प्रकरणाचा आरोप
तुमच्या शहरातून (पुणे)
किशोर आवारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी तळेगांव परिसरातील दुकानं बंद केल्याचं दिसलं तर प्रत्येक चौकात पोलिसांचा पहारा देखील तैनात करण्यात आला होता. किशोर आवारे यांची आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या हत्येप्रकरणी श्याम निगडकर आणि त्याचे 3 साथीदार यांच्यासह मावळ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
‘गेल्या 6 महिन्यांपासून माझा मुलगा शेळके बंधू आणि संदीप गराडे यांच्यापासून त्याच्या जिवाला धोका असल्याबाबत सांगत होता. 2 वर्षांपासून किशोर आणि शेळके राजकीय विरोधक असून किशोरने शेळकेंच्या अनेक चुकीच्या कामांविरोधात निदर्शने केली होती. त्याचा राग शेळकेंच्या मनात होता. आणि माझं काही बरं वाईट झालं तर ते याच लोकांकडून होईल, असं किशोरने प्रत्यक्षपणे सांगितलं होतं’ असं त्या फिर्यादीत सुलोचना आवारे यांनी नमुद केलं. त्यानुसार आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सुलोचना आवारे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन केलं होतं.
“दिवंगत किशोर आवारे यांच्यासोबत राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. आमचे विचाराच्या माध्यमातून मतभेद असतील पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं कोणी करत असेल तर ते कोणी करू नये. या घटनेला राजकीय वळण देऊ नका”, असं आवाहन त्यांनी केलं. तर पोलिस यंत्रणेला मी पूर्ण सहकार्य करत आहे, असंही सुनील शेळके म्हणाले.
चार आरोपींकडून धक्कादायक खुलासा
त्यानंतर मुख्य चार आरोपींना अटक करण्यात पिंपरी- चिंचवड पोलिसांना यश आलं. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी आरोपींची नावं. त्यांना वडगाव मावळातील जिल्हा आणि अति, सत्र न्यायालयाने आठ दिवसांची म्हणजेच 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर गोळी झाडणारा आणखी एक आरोपी श्रीनिवासन शिडगळला अटक करण्यात आली. मग आला या प्रकरणात मोठा ट्विस्ट. कारण या प्रकरणात नवीनच नाव समोर आलं ते म्हणजे गौरव खळदे. गौरव हा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा. त्यानेच ही हत्या घडवून आणल्याचं अटकेतील आरोपींनीच सांगितल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.
रागाच्या भरात विवाहिता माहेरी निघाली; पण रस्त्यातच घडलं भयानक कांड, बीड हादरलं
अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या
डिसेंबरमध्ये माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरून आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडीत लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली. यानंतर गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली. पण याहूनही मोठा ट्विस्ट म्हणजे त्याने ही हत्या स्वत: न करता आपला मित्र श्याम निगडकरकडून करून घेतली. आणि मैत्रीखातर श्यामने ते केलं सुद्धा.
मैत्रीखातर मित्राने केला खून
आरोपी गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनिअर. त्याचा स्वत:चा बांधकाम व्यवसाय. गौरव खळदे हा श्यामला वेळोवेळी आर्थिक मदत करायचा. याच मैत्रीखातर श्याम निगडकर आणि त्याच्या साथिदारांनी किशोर आवारे यांची हत्या केली. गौरव खळदे हा किशोर आवारे यांच्या हत्येचा कट जानेवारीपासून रचत होता. याशिवाय गेल्या महिन्याभरापासून किशोर आवारे यांची रेकी केली जात होती. अखेर तळेगांव नगरपरिषदेच्या कार्यालयात आवारेंना मारेकऱ्यांनी गाठलं आणि कोयत्याने वार करून गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.