Pune : जारमधून पाणी विक्री (Jar Water Sale) करणाऱ्यांना आता अन्न व औषध प्रशासनाची (FDA) परवानगी घ्यावी लागणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही जारची मागणी वाढत आहे. सुरक्षित पाण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
‘एफडीए‘ (FDA) बाटलीबंद पाण्याची (Package Drinking Water) गुणवत्ता नियंत्रित करते. पण, जेव्हा पाण्याची नाणे टाकून विक्री होते किंवा ते ‘कुल जार’मधून मोहोरबंद न करता विक्रीसाठी ठेवले जाते, त्या वेळी ‘एफडीए’च्या नियंत्रण कक्षाच्या बाहेर जाते. अशा वेळी पिण्यासाठी सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. त्यामुळे महापालिका किंवा संबंधित ग्रामपंचायतींनी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र या विक्री होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची, तसेच त्याच्या नियंत्रणाची कोणतीही यंत्रणा नसल्याचे या दोन्ही संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नाणे टाकून मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता नियंत्रित करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमिवर ही अधिसूचना महत्त्वाची ठरते.
पुण्यामध्ये (Pune) विशेषतः उपनगरांमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून दहा लिटर पाणी मिळणाऱ्या केंद्रांमधून हे जार भरले जात होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमिवर आपल्या पोटात जाणारे पाणी किती सुरक्षित आहे, याची काळजी प्रत्येक बाटली विकत घेताना केली पाहिजे. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे ही ‘एफडीए’ची (FDA) जबाबदारी आहे. त्यासाठी पाण्याच्या उत्पादन कक्षाची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा दर्जा बारकाईने तपासला जातो. त्यात दोष आढळल्यास उत्पादन थांबविण्यापर्यंतचे आदेश देण्याची तरतूद कायद्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘बीआयएस’चे महत्त्व
- ‘आयएसआय’ (ISI) मार्क असलेल्या बंद बाटलीतील पाणी घ्यावे.
- हे पाणी प्रयोगशाळेतून तपासणी केलेले असते.
- प्रक्रिया केलेल्या पाण्यात जिवाणूंची वाढ होत नाही.
- व्यवस्थित स्वच्छता असलेल्या ठिकाणी उत्पादन होते.
कायदा काय सांगतो ?
एका दिवशी दोन हजार लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या बाटलीबंद पाणी उत्पादक कंपनीला केंद्रीय परवाना आवश्यक असतो. त्यापेक्षा कमी उत्पादन क्षमतेच्या कंपनीला राज्य परवाना घेणे बंधनकारक असते. तसेच ‘बीआयएस’चा (BIS) परवाना अत्यावश्यक ठरतो. दरवर्षी याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते.
दरम्यान यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) म्हणाले, कि स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक जारमधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रकारच्या जारमधून पाणी विक्री करणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.