Winter Assembly Session : तब्बल २ वर्षांनी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे.
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session) आजपासून सुरुवात झाली आहे. यात महत्वाच्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी असल्यामुळे आजचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच लोकायुक्त कायद्याचं बिल देखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार ?
राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून यात सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
मविआ आमदारांची बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होईल. नागपूर विधानभवनात सकाळी दहा आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल पत्रकार परिषद झाली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आज सहा मोर्चे निघणार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
23 विधेयके प्रस्तावित
सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयकं आहेत तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयकं आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.
सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये प्रथमच अधिवेशन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिसेंबर 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळं नागपूरऐवजी मुंबईतच अधिवेशन पार पडले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिलंच हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. सत्तांतरांनंतर ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजापासून उद्धव ठाकरे दूर राहिले होते.