पेटगाव येथे महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव
Chandrapur : समाजातील साधू-संतांचे विचार हे समाज घडविण्यासाठी नेहमीच प्रेरक ठरले आहे. त्यांनी दाखवलेली दिशा ही समाजाला विकासाची वाट दाखविणारी असून यातून समाजाचे कल्याणच झाले आहे. अशा थोर संत महर्षी वाल्मिकी ऋषींनी जे महान ग्रंथ रामायण रचिले त्या ग्रंथातूनच जगाला प्रभू रामचंद्राच्या चरित्राची संपूर्ण ओळख झाली, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते महर्षी वाल्मिकी भोई समाज पेटगावच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते.
महर्षी वाल्मिकी भोई समाज पेडगाव यांच्या वतीने नव्याने स्थापना करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून अनावरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमाकांत लोधे, दत्तात्रय कवठे, दादाजी चौके, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, माजी प.सं. सदस्य राहुल पोरेड्डीवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोडणे, वीरेंद्र जयस्वाल, सचिन नाडमरवार, नगरसेवक पंकज नन्नेवार, अनिल उट्टलवार, सुशांत बोडणे,अरुण साहारे व नागरिक व समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, की भोई समाज हा फार मेहनती समाज असूनही अद्याप विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. म्हणून या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता महाविकास आघाडी सरकार काळात आपण मंत्री असताना भोई समाज बांधवांना हक्काची घरे देण्याहेतू प्रयत्न चालवून सिंदेवाही तालुक्यात एकूण 1174 घरकुले मंजूर केली. तसेच या समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे, याकरिता महाज्योती अंतर्गत योजना कार्यान्वित केल्या होत्या. कोळी समाज बांधवांचा मुख्य व्यवसाय मासेविक्री असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात येणारे कंत्राट मोठ्या कंत्राटदाराच्या घशात जात असून केवळ मजुरी देऊन कोळी बांधवांची उपेक्षा केली जात आहे. त्यामुळे वाढती महागाई व समाजात असलेली निरक्षरता समाजाच्या उन्नतीत अडसर ठरत आहे. कोळी समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित होऊन समाजाला दिशा देण्याची काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपण कोळी समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.