Jalna Andolan News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला, आश्रुधुर आणि गोळीबारामुळे सध्या पोलिसांबद्दल काही घटकांत तिरस्काराची भावना आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीत उठून दिसणारे आणि सामान्यांनाही आपलेले वाटणारे काम बीड पोलीस दलाने केले आहे. बीड पोलिसांनी केलेली संवेदनशिल आंदोलनाची टॅकलिंगचा धडा इतर जिल्ह्यांनीही घ्यावा, असे गुळज (ता. गेवराई) येथील आंदोलनाच्या निमित्ताने दिसले.
चकलांबा (ता. गेवराई) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे संवेदनशिल आंदोलन बीड पोलीस दलाने कौशल्याने हाताळले आहे. शिवाय आंदोलनानंतर आंदोलकांनीच बंदोबस्तावरील २०० पोलिसांना दाळ बाटीची जेवण पंगत दिली हे विशेष. याहून विशेष बाब म्हणजे सदर आंदोलन देखील अंतरवाली सराटी येथील पोलिसांच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ असताना आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या (Police) जेवणाची खास सोय केली. आंदोलक आणि पोलीस एकत्रच या पंगतीत जेवले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणीसाठीच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या समाजबांधवांवर लाठीहल्ल्याची घटना घडली होती. यात महिला, तरुण व विद्यार्थीही जखमी झाल्याने सर्वत्र याचा निषेध केला जात आहे. परिसरातच वाहनेही जाळण्यात आली आहेत. या आंदोलनाची सर्वप्रथम धग गेवराई तालुक्यात उमटली. गेवराई शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांत बंद पाळला गेला. विशेष म्हणजे या गुळज गावातच बसही पेटवून देण्यात आली होती. दरम्यान, रविवारी (ता. ३) आरक्षणाची मागणी व लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुळज येथील गोदापात्रात जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले.
सध्या गोदाकाठ म्हणजे ‘हॉट पट्टा’ मानला जातो आहे. आंदोलनस्थळ बीड (Beed) जिल्ह्यातले असले तरी याची हद्द छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्याची आहे. त्यामुळे सहाजिकच या भागातील आंदोलनकर्तेही सहभाग घेणार होते. त्यामुळे पोलिसांसमोर आंदोलन हाताळण्याचे मोठे आव्हान होते.
मात्र, यात खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी लक्ष घातले. बंदोबस्तासाठी तगडा फौजफाटा लावतानाच आंदोलनादरम्यान हिंसक बाब घडू नये यासाठी अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निरज राजगुरु व चकलांबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे आदी प्रमुखांची ठाकूर यांनी बैठक घेत ‘पोलिसींगनेच भागणार नसून सामान्यांत मिसळा’ हा कानमंत्र दिला. त्यादृष्टीने उपाय योजना केल्याने आंदोलनही झाले आणि पोलिसांची समाजातील आपुलकीही वाढली.
‘आमचा तुमच्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र, बाहेरचे लोक आले आणि हिंसक घटना केली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा सलग तीन दिवस गुळज व परिसरातील प्रमुख आंदोलनकर्त्यांना समजावल्याने १० हजार लोकांचा आंदोलनातील संभाव्य मॉब दिड हजारांवर आणण्यात पोलिसांना यश आले. या प्रतिबंधात्मक उपाय योजनानंतरही काही घडले तर परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ पोलिसींगच नाही तर मासे पकडणाऱ्या कहार समाजातील चांगल्या २० तरुणांना हाताशी ठेवतच १० चप्पूही तयार ठेवले. आंदोलनासाठी नदीपात्रात जागा निश्चित करुन दोन हजार फुटांची दोरीही बांधण्यात आली. अग्निशामक दलाच्या वाहनासह, ॲम्बुलन्स व डॉक्टरांची टिमही तयार ठेवण्यात आली. वर्दीवरील सर्व टिमसह सिव्हील ड्रेसवरील हि टिम आंदोलकांच्या आसपास थांबून होती.
आंदोलकांना विरोध करण्याऐवजी त्यांना सर्व गोडीत सांगीतल्याने आंदोलक दिड तास नदीत थांबले. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनापूर्वीच्या तिन दिवस पोलीस व आंदोलन प्रमुखांमधील वाढलेल्या संवादाने त्यांच्यात जवळीकताही आली. ‘तुम्ही बंदोबस्तावरील पोलीस मंडळी जेवणार कुठे, असा मुद्दा आंदोलकांनीच काढला. सदर गाव दुर असल्याने तुमची गैरसोय होईल त्यामुळे तुमच्या जेवणाची सोय आम्ही करतो, म्हणून आंदोलकांनीच पुढाकार घेतला. मालेगावच्या एका शाळेत बंदोबस्तावरील २०० पोलीस आणि शंभर आंदोलनकर्ते एकत्र जेवले. यात ५० महिला पोलिसही होत्या.
गुळजचे आंदोलन हाताळणे आव्हान होते मात्र ही पोलिसींगमधी नित्याची बाब आहे. पोलीस दलाबरोबरच स्थानिक आणि आंदोलकांचे देखील कौतुक आहे. समाज म्हणून नागरिक व पोलीस दोन प्रुमख घटक आहेत. त्यांनी कायम एकत्र असले पाहीजे. असे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले.