मंत्रालयात बंजारा समाजाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न
मुंबई, प्रतिनिधी : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून येत्या १२ फेब्रुवारी रोजी पोहरागड येथे होणाऱ्या कार्यक्रमात याची घोषणा करू, असे आश्वासन उपस्थित बंजारा समाजाच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाला दिले. यावेळी मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे होणाऱ्या संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, सेवध्वजाची स्थापना व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, आ. निलय नाईक, आ. इंद्रनील नाईक, आ. राजेश राठोड, आ. संजय गायकवाड, आ. किशोर पाटील, माजी आमदार हरिभाऊ राठोड, अनंतकुमार पाटील व विविध संघटनांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.