चेन्नई, 06 मे : आयपीएलमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यावर पावसाचे संकट आहे. याआधीही चेन्नईचा लखनऊविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई यांचा सामना हाय व्होल्टेज सामन्यांपैकी एक असतो.
चेन्नई आणि मुंबई यांच्यातला यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नईने जिंकला होता. घरच्या मैदानावर मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स चेपॉकच्या मैदानावर उतरेल. मुंबई इंडियन्स 2010 पासून चेपॉकच्या मैदानावर एकही सामना हरलेली नाही. सलग सहा सामन्यात विजय मिळवला आहे. 2011 पासून 2019 पर्यंत संघ अपराजित राहिलाय. 2008 आणि 2010 मध्ये संघाला पराभूत व्हावं लागलं होतं.
IPL 2023 : मुंबई विरुद्ध चेन्नई महामुकाबला! रोहित शर्मा या खेळाडूंना देणार प्लेईंग 11 मध्ये संधी
चेन्नईत शनिवारी पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबई आणि चेन्नईचा संघ सराव करत असतानाच आकाशात पावसाचे ढग दाटून आले होते. शनिवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. प्लेऑफच्या दृष्टीने मुंबई आणि चेन्नईसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चेन्नईचे 10 सामन्यात 11 गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानी आहेत. तर मुंबईचे 9 सामन्यात 10 गुण झाले असून पॉइंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. लखनऊ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसाने रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला होता.
चेपॉकची खेळपट्टी ही फिरकीपट्टूंना पोषक मानली जाते. पण आयपीएल 2023 मध्ये फलंदाजांनी कमाल केल्याचं दिसतंय. यंदाच्या हंगामात चेपॉकच्या खेळपट्टीवर फिरकीपट्टूंना मदतच झाली. पण उसळी मिळत असल्यानं फलंदाजांनाही याचा फायदा झालाय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला जो संघ नाणेफेक जिंकेल तो गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.