Minister Dada Bhuse : व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की कुठला आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न विचारात जेव्हा पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय ? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडीओसोबत राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलिस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला.”
नेमकं काय आहे त्या व्हिडीओत ?
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला दादा भुसे यांचा व्हिडीओ हिरकणी कक्षातील आहे. या व्हिडीओमध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना काही प्रश्न विचारत आहे. हे दोन्ही तरुण मद्यपान केलेले दिसत आहे. दादा भुसे यांच्या बोलण्यातून, त्या दोन्ही तरुणाला रविवारी त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज त्यांची सुटका झाली आहे. दादा भुसे त्यामधील एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. त्याशिवाय त्यांना शिव्याही दिलेल्या व्हिडीओत दिसत आहे. त्या दोन्ही तरुणांची नेमकी चूक काय होती ? कोणत्या कारणासाठी दादा भुसे मारहाण करत आहेत ? हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे.
दादा भुसेंच्या अडचणी वाढणार…
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळातील सहकारी अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी आधीच टीका करण्यास सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गायरन जमीन घोटाळा प्रकरण आणि कृषी महोत्सवासाठी देणगीच्या नावाखाली पैसे लाटण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर आता दादा भुसे यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अब्दुल सत्तार तर दुसरीकडे दादा भुसे यांचा या व्हिडीओचा प्रकार यामुळे सत्ताधाऱ्यांची तारेवरची कसरत होणार आहे. दादा भुसे व्हायरल व्हिडीओवर काय उत्तर देतात, आणि यावर विरोधकांचं समाधान होतेय का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.