पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मनसेने आपली भूमिका जाहीर केली असून पोटनिवडणुकीसाठी मनसेने भाजपला आपला पाठिंबा दिला आहे.
एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलेले आहे. महाविकास आघाडी, भाजप आणि अपक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना मनसेने मात्र तटस्थ भूमिका स्वीकारली होती. पण, आता मनसेनं आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते बाबू वागस्कर यांनी मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका मनसेवर केली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, असं ट्विट करत प्रशांत जगताप यांनी राज ठाकरेंवरही हल्लाबोल केला. जगताप यांच्या या ट्विटमुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंगळवारी मनसेनं कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.