मनसेचा पुण्यातील आक्रमक चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी काही सूचक संकेत दिले आहेत. अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याची बाब त्यांनी मान्य केली. मी सध्या मनसेतच आहे, पण अलीकडे मला पक्षसंघटनेतील लोकांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार का, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्यातील लग्नसमारंभात घडलेला प्रसंग कथन केला. मी लग्नात स्टेजवरून खाली उतरलो आणि रुपाली चाकणकर यांच्याशी बोलत उभा होतो. त्यावेळी दूरवर असलेल्या अजितदादांशी माझी नजरानजर झाली. यानंतर आम्ही दोघेही गर्दीतून वाट काढत एकमेकांपाशी गेलो. तेव्हा दादा म्हणाले की, अजून किती दिवस नाराज. या आम्ही वाट बघतोय. त्याच्यानंतर जातानाही अजित पवार म्हणाले की, वसंतराव मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही या माझ्याकडे, आपण बोलू. यानंतर अजित पवार निघून गेले, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
या सगळ्या घडामोडींमुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले. मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे. मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वसंत मोरे यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता भविष्यात ते वेगळा विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
वसंत मोरेंचा खंदा समर्थक मनसेतून बाहेर
वसंत मोरे यांचा खंदा समर्थक म्हणून ओळखले जाणारे माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांनी अलीकडेच पदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी आपल्या ४०० कार्यकर्त्यांसह मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. निलेश माझिरे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, हे पाहावे लागेल. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर निलेश माझिरे आणि वसंत मोरे हे दुसऱ्या पक्षात गेल्यास तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का असले. आजघडीला पुण्यात मनसेकडे वसंत मोरे यांच्याइतका लोकप्रिय चेहरा नाही. मात्र, पक्षातील इतर लोकांशी त्यांचे वारंवार खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे राज ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी किती दिवस मनसेत राहणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.