छत्तीसगड, 26 एप्रिल : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भू-सुरंगस्फोटामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. अरणपुरच्या जंगलामध्ये हा स्फोट माओवाद्यांनी केला असून अजूनही माओवादी आणि जवान यांच्यामध्ये त्या ठिकाणी चकमक सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचणे कठीण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडी जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान अरनपूर मार्गावर IED स्फोट घडवण्यात आला. या भीषण स्फोटात 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला.
तसंच, दंतेवाडा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर बॉम्ब फेकले आहे. या चकमकीत काही जवान हे जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी एक पिकअप व्हॅन बॉम्बस्फोटाने उडवून दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ही घटना अरनपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. नक्षलवाद्यांचं मुळ कायमच संपवलं जाईल. आम्हाला जी माहिती मिळाली ती अत्यंत दुख:द आहे. शहीद जवानांबद्दल संवेदना व्यक्त करत आहोत.
घटनेचं गांभीर्य पाहात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना माहिती देण्यात आली आहे. शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री बघेल यांनी फोनवर चर्चा केली आहे. अतिरिक्त मदत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.