पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन जनता त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत बोलताना म्हटलं आहे की, पेट्रोल डिझेल संपणार. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे. पाणी आणि बायो मासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाला तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असं गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी म्हटलं की, जोपर्यंत कृषी आणि ग्रामीण क्षेत्र विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत नाही, आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी येतील. आज देशात गहू, मका, तांदूळ या पिकांचे अतिरिक्त उत्पादन. पण डाळी मात्र आयात कराव्या लागतात. गडकरींनी सांगितलं की, जोपर्यंत आपण राज्याच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला अपले महत्त्व पटत नाही. मी उत्तर प्रदेशच्या उस मंत्र्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यायला सांगितले. त्यातून त्यांचा साखर उतारा साडे नऊ पासून साडे अकरा पर्यंत गेला तर उत्पादन चाळीस ते पंचेचाळीस टनांपर्यंत गेलं, असं ते म्हणाले.
उसाचे दर कमी करणं अवघड, कारण त्यात खूप राजकारण
गडकरी यावेळी म्हणाले की, पंधरावर्ष साखर उद्योगात काम करुनही नुकसान झाले. पण हे पहिले वर्ष असे आहे की यावर्षी ना नफा ना तोटा इथपर्यंत आलोय. तुमच्याही चेहर्यावर हास्य आहे आणि माझ्याही. कारण यावेळेस साखर मोठ्याप्रमाणात निर्यात करण्यात आलीय. उसाचे दर कमी करणं अवघड आहे. कारण त्यात खूप राजकारण आहे. साखरेचे भाव कमी होतील पण उसाचे नाही, असंही गडकरी म्हणाले.
ऑटोमोबाईल कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी आग्रह
मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होऊन पंचवीस- सव्वीस रुपये प्रति किलो इतके कमी होतील. कारण इथेनॉलशी संबंधित हा उद्योग आहे. फ्लेक्स इंजिनमध्ये 100 टक्के पेट्रोल ऐवजी 100 टक्के इथेनॉल टाकता येईल. यामुळे मी ऑटोमोबाईल कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी आग्रह करतोय. पुण्यातील सर्व दुचाकी, रिक्षा इथेनॉलवर करा. इथेनॉल एक लिटर 62 रुपये तर पेट्रोल 120 रुपये आहे. पुण्यात हे सगळ्यात आधी सुरु करा. मी इथेनॉलचे पंप द्यायला सांगतो, असंही ते म्हणाले. टोयोटा, टाटा, महिंद्रा इत्यादी सगळेच ऑटोमोबाईल उत्पादक फ्लेक्स इंजिन आणणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.