आग्रा, 22 मे : 2000 रुपयांची नोट बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा नोटांसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही, RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली आहे. पण 2016 मध्ये नोटबंदी झाली तेव्हा काळ्या धंद्याशी संबंधित लोक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची विचित्र पद्धतीने विल्हेवाट लावत होते. तेव्हा काही लोक नोटा जाळत असल्याची अफवाही पसरली होती.
आज आम्ही तुम्हाला आग्रामधील असेच एक ठिकाण सांगणार आहोत, जिथे ब्रिटिश काळात नोटा आणि चलन जाळले जायचे. ही जागा आजही छीपीटोला एसबीआय बँकेच्या परिसरात आहे. फाटलेल्या नोटा जाळण्यासाठी या ठिकाणी चिमणी तयार करण्यात आली होती. सुमारे 15 फूट उंचीच्या चिमणीच्या खाली एक भट्टी होती. यावेळी जमवलेल्या खराब नोटा भट्टीत टाकल्या जायच्या.
1934 सालापर्यंत सुरु होता वापर :
आग्रा छीपीटोला येथील एसबीआय शाखेच्या परिसरात ऐतिहासिक चिमणी आजही आहे. इतिहासकारांच्या मते ब्रिटीश राजवटीत आग्रा येथील बँकिंग व्यवस्था अतिशय मजबूत होती. येथे इंडियन इम्पीरियल बँक फाटलेल्या नोटा जाळण्यासाठी नोटा जमा करत असे आणि अनेक वर्षांपासून येथे नोटा जाळण्याचे काम केले जात होते. नोटा जाळण्यासाठी भट्टी आणि चिमणीही बनवली गेली, जी आजही तेथे आहे. त्या चिमणीवर स्पष्ट लिहिले आहे की 1934 पर्यंत इथे इंग्रजांनी नोटा जाळल्या होत्या.
तवारीख-ए-आग्रा या पुस्तकात उल्लेख :
आग्राचे प्रसिद्ध इतिहासकार राज किशोर राजे यांनीही त्यांच्या ‘तवारीख-ए-आग्रा’ या पुस्तकात या ठिकाणाचा आणि घटनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की आग्रा हे ब्रिटीश राजवटीत बँकिंगचे प्रसिद्ध केंद्र होते. येथे इंडियन इम्पीरियल बँक फाटलेल्या नोटा जाळण्याचे काम करत असे. या भट्टी आणि चिमणीची देखभाल ही पर्यटन विभागाची जबाबदारी आहे. काही वर्षांपूर्वी या भट्टीचे नूतनीकरण पर्यटन विभागाकडून करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.