पंतप्रधान मोदी २ ते ४ मे दरम्यान विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यंदा त्यांची ही पहिली विदेशवारी असून ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून (MEA) माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी बर्लिनमध्ये जर्मनीचे फेडरल चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही नेते भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतीच्या दृष्टीने चर्चा करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगनला जाणार आहेत. डेन्मार्कने आयोजित केलेल्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही ते सहभागी होतील. 4 मे रोजी ते परतीच्या प्रवासात पॅरिसमध्ये थांबतील आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेटतील. यंदा भारत आणि फ्रान्स यांच्यामधील संबंधाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट घेऊन दोन्ही देशातील संबंध आणखी मैत्रीपूर्ण करण्यासंबंधी चर्चा करतील, असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्याने पंतप्रधान मोदींचे विदेश दौरे देखील रद्द झाले होते. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने मोदी इटली आणि ब्रिटनच्या पाच दिवशीय दौऱ्यावर गेले होते. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान त्यांनी इटलीला भेट दिली होती. त्यानंतर मोदी १ ते २ नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या आयोजित बैठकीत सहभागी झाले होते.