समाजात विवीध क्षेत्रात वावरणाऱ्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारणे गरजेचे असून जनसेवेतून मिळणारा आनंद हा निराळाच आहे. यात केलेली सेवा सार्थक ठरवून मिळालेले पुरस्कार म्हणजे भविष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी दिलेली प्रेरणा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित महा आवास घरकुल योजनेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते ,आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, महिला तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, कृउबा समिती प्रशासक प्रभाकर सेलोकर, माजी प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, संवर्ग विकास अधिकारी पुरी, व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरी मतदारसंघातील प्रत्येक खेड्यापाड्यातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील परकाष्टा करून मंत्री पदावर असताना घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारो कुटुंबीयांना लाभ मिळवून दिला. तसेच मतदार संघात कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला व मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. ही जनसेवा करताना मनाला मिळणारा आनंद हा निराळाच असून आपणही जनसेवेच्या माध्यमातून कर्तव्य बजावून केलेली कामगिरी ही सार्थक ठरवून त्याचा पुरस्कार हा मोबदला आहे. जीवनात पुरस्काराने एक आगळीवेगळी ऊर्जा मिळत असून ती भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा ठरते असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यानंतर सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कृत ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत गांगलवाडी प्रथम, पारडगाव द्वितीय, वांद्रा तृतीय,तर राज्य योजनेत ग्रामपंचायत सुरबोडी प्रथम, एकारा द्वितीय, नंहोरी तृतीय, तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट घरकुल केंद्र पुरस्कृत सरपंच ग्रामसेवक व लाभार्थी यांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे ,प्रस्ताविक संवर्ग विकास अधिकारी पुरी तर आभार विस्तार अधिकारी जयेंद्र राऊत यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्याने तालुक्यातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते