Jalna Protest News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. (Raj Thackeray Visit Antarwali Sarati) ही भेट घेत असतांना आतापर्यंतच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने या विषयाचे राजकारण करून तुमची मतं कशी पदरात पाडून घेतली, हे राज ठाकरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, या केलेल्या आवाहनाचा समचारही ठाकरे यांनी आपल्या शैलीत घेतला.
देवेंद्र फडणीवस काल कुठेतरी म्हणाले, या गोष्टीचे कुणी राजकारण करु नये, अरे वा, तुम्ही विरोधी पक्षात असतात तर राजकारण केले नसते का ? असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना केला. (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्याशी दहा मिनिटे चर्चा केल्यानंतर (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी तिथे उपस्थितीत आंदोलकांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांवर टीका केली, मात्र त्यांचे लक्ष्य उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.
आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याला पोलिस जबाबदार नाहीत, तर ज्यांनी त्यांना मंत्रालयालत बसून आदेश दिले ते जबाबदार आहेत, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला. (MNS) निवडणुका आल्या की मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागयची आणि सत्ता आली की तुम्हाला लाथा घालायच्या गोळ्या घालायच्या. ज्यांनी तुमच्यावर लाठ्या, गोळ्या चालवल्या त्यांना आधी मराठवाड्यात बंदी घाला, त्यांना इथे येऊ देऊ नका. जोपर्यंत झालेल्या घटनेबद्दल ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना इकडे फिरकू देऊ नका, असेही राज ठाकरे म्हणाले.
राजकारण करू नका, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षात असते तर काय केले असते ? या विषयाचे राजकारणच केले असते ना ? विरोधी पक्षात असले की यांना तुमच्याबद्दल प्रेम येते, सत्ता आली की, बाजूला लोटतात. अशा गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी तुमचा जीव गमावू नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी जरांगे यांना केले. आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा व्हिडिओ पाहिला, तो प्रकार भयानक होता.
पोलिसांना जसे आदेश आले तसे त्यांनी केले, त्यामुळे त्यांना दोष देऊ नका. मुळात हे आदेश तिथे बसून कोणी दिले ? हा खरा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे थोडा कायदा देखील समजून घ्या, असा सल्ला देखील ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. निवडणुका आल्या की पुन्हा हे येतील तेव्हा या काठीचे वळ मात्र लक्षात ठेवा, असेही ठाकरे यांनी उपस्थितांना सांगितले.