स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकास हा काँग्रेसनेच केला आहे यात कुणालाही दुमत असण्याचे कारण नाही.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण योगदान राहिले ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचेच,त्यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात विकासाच्या योजना आखल्यानेच या क्षेत्रात क्रांती झाली आणि या क्षेत्राचा वापर करूनच नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले.त्यामुळे खरेतर मोदींनी पंतप्रधान झाल्याचे श्रेय राजीवजींनाच दिले पाहिजे असो.
देश विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावा आणि करोडो भारतीयांच्या जीवनात नवचैतन्य यावे यासाठी आरोग्य,शिक्षण आणि रोजगार या क्षेत्राला त्यांनी प्राधान्य दिले.
कृषिप्रधान देश हा औद्योगिक देश म्हणूनही ओळखला जावा यासाठी त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड त्यांनी दिली.
तंत्रज्ञान क्षेत्रातील ख्यातनाम सॅम पित्रोदा यांना मदतीला घेऊन दूरसंचार क्षेत्रात त्यांनी पाया पक्का केला.यामुळे देशातील शहरे, गावे आणि खेडेसुध्दा दूरसंचार साखळीने जोडली गेली.एसटीडी व आयएसटीडीमुळे अनेकांना ग्रामीण भागात रोजगार मिळाला.
आज प्रत्येकाच्या हातात दिसणारा मोबाईल व इंटरनेट ही राजीव गांधी यांचीच देन आहे.त्यांनी एमटीएनएल कंपनी स्थापन करून अगदी खेड्यापाड्यात मोबाईल एक्सचेंज टॉवर उभारले.तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी कंपन्यांची वाढ व्हावी यासाठी धोरणे देखील आखली.
सोव्हिएत युनियनऐवजी अन्य अमेरिका व पश्चिमात्य देशांशी जवळीक साधून देशाच्या परराष्ट्र धोरणाला एक नवी दिशा दिली.
राजकीय स्तरावरील आयाराम गयाराम संस्कृती मोडीत काढण्यासाठी त्यांनी ५२ वी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा आणला.घोडेबाजार बंद व्हावा आणि सरकारे स्थिर चालावी हा त्यामागील उद्देश होता मात्र आता हा कायदा मोडीत काढण्याचे काम सुरू झाल्याचे क्षणोक्षणी जाणवते.
सन १९८६ मध्ये नवे शैक्षणिक धोरण आणून शहरी व ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया बळकट करण्यास सुरुवात केली.यातूनच अनेक शाळा आणि महाविद्यालये उभी राहिली.यामुळे गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पहिली ते उच्च शिक्षणापर्यंतचा मार्ग मोकळा झाला.तसेच दिल्ली येथे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करून शिक्षणव्यवस्थेत मोठी भर घातली आजही या विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे.
कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते,कीटकनाशके,अधिक उत्पादन देणारे बियाणे,शेती औजारे बनविण्यावर भर दिला.त्यांच्या कृषी मालाला किमान हमीभाव दिला.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली हरितक्रांती पुढे नेण्याचे आणि जलसंधारण कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले.
पंचायत राज व्यवस्था सुरू करून सर्व समाज घटकांना विविध स्वायत्त संस्थामध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली यासाठी त्यांनी ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती केली.पंचायत राज प्रणालीमुळे देशाच्या विकासात भर पडली.ज्याद्वारे या व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला,यामध्ये पंचायत राज व्यवस्थेची रचना,राखीव जागांची तरतूद,महिलांसाठी ३३% जागा राखीव,लोकसंख्येच्या प्रमाणात SC/ST साठी राखीव जागा, कार्यकाळ,अधिकार, जबाबदाऱ्या, अपात्रता यासह अनेक विषय निश्चित करण्यात आले होते.तसेच युवा वर्गाला लवकर राजकीय अधिकार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी मतदानाचे वय २१ वरून १८ वर्ष देखील केले.
यासह विविध क्षेत्रात राजीव गांधी यांनी केलेले कार्य देशाला दिशा देईल.देश उभारणीसाठी,देश जोडण्यासाठी त्यांचे कार्य देशातील करोडो जनता कायम लक्षात ठेवेल अशी आशा व्यक्त करते.