भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी वयाच्या ६२व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना २-३ आठवड्यापूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. ()
शेअर बाजाराचे किंग म्हणूनही राकेश झुनझुनवाला यांची ओळख होती. त्यांनी नुकतीच अकासा ही एअरलाइन सुरू केली होती. फोर्ब्सच्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलीयन डॉलर्स आहे. फक्त ५ हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या राकेश यांनी आता करोडोंचा डोलारा उभा केला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा सामान्य सीए ते शेअर मार्केटमधील बिग बुल असा प्रवास जाणून घेऊया… ()
१९८५ सालापासून राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. शेअर मार्केटमध्ये त्यांनी पाच हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक आज कोट्यवधींच्या घरात आहे.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जून १९६० साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. त्यांचे वडिल आयकर अधिकार होते. राकेश झुनझुनवाला कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना शेअर बाजाराचे आकर्षण होते. मात्र, वडिलांनी सुरुवातीला विरोध केला होता. तसंच, शेअर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर स्वतःच्या मेहनतीने पैसे कमव, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं. त्यानंतर, झुनझुनवाला यांनी १९८५ साली फक्त पाच हजार रुपयांचे शेअर्स खरेदी करुन करिअरची सुरुवात केली होती.
राकेश झुनझुनवाला यांनी त्यावेळी टाटा समूहाच्या ‘टाटा टी’चे ४३ रुपयांना पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ रुपयांपर्यंत वाढली. त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिनपट अधिक पैसे त्यांना या शेअरमधून मिळाले. या तीन महिन्यात २.१५ लाखच्या गुंतवणुकीवर पाच लाखांचा नफा झाला होता.
पुढील तीन वर्षांत राकेश झुनझुनवाला शेअर्समध्ये पैसे गुंतवून करोडपतींच्या यादीत आले. या तीन वर्षांत त्यांनी सुमारे कोटींचा नफा कमावला होता. यानंतर त्यांनी टाटा ग्रुपच्या दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि त्यामुळं राकेश झुनझुनवालाला बिग बुल म्हणून ओळखले जाऊ लागले. २००३ मध्ये त्यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये पैसे गुंतवले. त्यावेळी त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स तीन रुपये दराने खरेदी केले होते. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे ४.५ कोटी शेअर्स होते, ज्यांचे मूल्य ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
२००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म ‘रेअर एन्टरप्रायझेस’ची स्थापना केली. तर अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी सुमारे ५० दशलक्ष डॉलर्सच्या मोठ्या गुंतवणुकीसह त्यांची अकासा ही एअरलाइन सुरू केली आहे.