मुंबई, 19 मे : आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री सनरायजर्स हैदाबादला हरवून आरसीबीने प्लेऑफच्या शर्यतीत आणखी चुरस निर्माण केली. आरसीबीने सामना 8 विकेट आणि 4 चेंडू राखून जिंकला आणि पॉइंट टेबलमध्ये टॉप फोरमध्ये स्थान मिळवलं. यामुळे मुंबई इंडियन्सला फटका बसला असून ते पाचव्या स्थानी घसरले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला किती संधी आहे हे पाहू.
गुजरात टायटन्स आयपीएलच्या प्लेऑमध्ये पोहोचली आहे. आता प्लेऑफसाठी तीन जागा शिल्लक आहेत. यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचेही स्था भक्कम मानले जात आहे. दोन्ही संघांचे 15 गुण झाले आहेत.
आरसीबी चौथ्या क्रमांकावर असून सनरायजर्स विरुद्धच्या आधी त्यांची स्थिती करा किंवा मरा अशी होती. आरसीबीने सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचेही 14 गुण आहेत मात्र रनरेटच्या आधारावर आरसीबी पुढे आहे.
IPL 2023 : क्लासेनच्या शतकावर विराटचं शतक भारी, RCBच्या विजयाने वाढलं मुंबईचं टेन्शन
आरसीबीचा शेवटचा सामना गुजरात टायटन्ससोबत आहे. जर त्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला तर त्यांचे 16 गुण होतील आणि चेन्नई, लखनऊ आणि मुंबई या संघांनी त्यांचे अखेरचे सामने गमावल्यास आरसीबी टॉप 2 मध्ये पोहोचू शकते. असं झाल्यास गुजरात, आरसीबी, चेन्नई आणि लखनऊ प्लेऑफमध्ये पोहोचेल. तर मुंबई इंडियन्स 14 गुणांवरच राहील.
प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर चेन्नई, लखनऊ, आरसीबी, मुंबई यांना अखेरचा सामना जिंकावाच लागेल. चेन्नई आणि लखनऊने जरी त्यांचे अखेरचे सामने गमावले तरी त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. पण मुंबई किंवा आरसीबी यांच्यापैकी एका संघाने अखेरचा सामना गमावला तरच ते शक्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.