Washim : पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची (Atrocities Act) माहिती देणाऱ्या “सलोखा” या पॉकेट बुकचे (Pocket Book) प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मारोती वाठ आणि जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) व्यक्तींना अन्याय अत्याचारापासून संरक्षण मिळावे. अशा घटनांना प्रतिबंध व्हावा, सर्व जाती धर्माच्या व्यक्तींमध्ये सलोख्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी ॲट्रॉसिटी कायदा (Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989) तयार केला आहे. या कायद्याची माहिती देणारे “सलोखा” (Salokha) हे पॉकेट बुक (Pocket Book) जिल्हा माहिती कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहे.
या “सलोखा” पॉकेट बुकमध्ये भारतीय संविधानाची प्रास्ताविका, प्रस्तावना, या कायद्याच्या अनुषंगाने विविध कलमे, कायद्याचे निकष, अत्याचारग्रस्त आणि साक्षीदारांचे अधिकार, तपास करणारा अधिकारी यांच्या या कायद्याबाबत कर्तव्ये व जबाबदाऱ्या, पोलिसांनी साक्षीदारांची जबानी घेण्याबाबत कार्यपद्धती, अत्याचाराची घटना घडल्यानंतर अत्याचारग्रस्ताने काय करावे, काय करू नये, या कायद्यात सुधारित अधिनियम २०१५ च्या नव्या कलमांची माहिती, अत्याचाराला बळी ठरलेल्या व्यक्तींना मिळणारी नुकसान भरपाई, तसेच मनोधैर्य योजनेबाबतची अनेक माहिती देण्यात आलेली आहे.