वाशिम, प्रतिनिधी : बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेली श्री क्षेत्र पोहरादेवी (पोहरागड) येथे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सेवाध्वज स्थापना व संत सेवालाल महाराज पुतळा अनावरण सोहळा हा ऐतिहासिक होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे व मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते वाशिम येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथील कार्यक्रमात बोलत होते.
पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी असून या ठिकाणी भारतातून लाखो भाविक भक्त येतात. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व पोहरादेवीच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असून या कार्यक्रमाला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री राठोड यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा. वसंत राठोड, सुभाष राठोड, संतोष राठोड, संजय पवार, रणजीत जाधव यांच्यासह वाशीम तांड्याचे नायक कारभारी, तसेच कवरदरी, किन्हीराजा, सउदी, वरदरी, उमरदरी, गणेशपूर, सोंडा, दुधखेडा, कोंडाळा, खैरखेडा, जोडगव्हाण, पांग्रीसह अनेक गावातील बंजारा समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराव जाधव यांनी केले. तर संचलन विजय जाधव यांनी आणि श्रावण जाधव यांनी आभार मानले.