Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी अधिसूचनेचा मांडलेला विषय अधिवेशनात चांगलाच गाजला. “पण वेळेअभावी अनेक मुद्दे अधिवेशनात मांडता येत नाहीत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळी अधिवेशनाचे काल (शुक्रवारी) सूप वाजले. अधिवेशनात युवा वर्गाचे अनेकमुद्दे मांडता आले नाहीत. यावर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
“युवा आमदारांना बोलण्याची संधी फार कमी मिळते, त्यामुळे अनेक मुद्दे वेळेअभावी मांडता आले नाहीत, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. युवकांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतलं जात नसल्याचं पाहून वाईटही वाटलं. युवकांचे प्रश्न प्रखरपणे मांडायचे असतील तर युवा प्रतिनिधींची संख्या अधिकाधिक असण्याची गरजही प्रकर्षाने जाणवली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशनात युवकांच्या व्यथा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युवकांचे प्रश्न प्रखरपणे मांडायचे असतील तर युवा प्रतिनिधींची संख्या अधिकाधिक असण्याची गरजही प्रकर्षाने जाणवली. तरुणांचे प्रश्न सभागृहात, रस्त्यावर आणि प्रत्येक ठिकाणी नेहमीच मांडत राहील, तुम्हीही सोबत आहात याची खात्री आहे,” असे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी अधिसूचनेचा विषय अधिवेशनात चांगलाच चर्चेत आणला. शासकीय नोकर भरती, स्पर्धा परिक्षेसाठी घेतले जाणाऱ्या शुल्कावर रोहित पवारांनी मोठा आक्षेप घेतला. राजस्थान राज्याच्या धर्तीवर जॉब कार्ड द्यावे, आणि स्पर्धा परीक्षा विनाशुल्क घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती.