मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव म्हणजे ‘सचिन पिळगावकर’. अनेक चित्रपट, शेकडो भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. मराठीच नव्हे तर हिंदीतही त्यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी ‘गंधार’ संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार 2022’ हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सचिन पिळगावकर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानिक करण्यात आले आहे. नुकताच त्यांना अजून एक पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘गंधार’ या नाट्य संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित सोहळ्यात देण्यात येणार आहे.
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.