स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 10 एप्रिल: देशातील सर्वात मोठ्या ‘रुस्तुम ए हिंद, बैलगाडी शर्यतीचा थरार सांगली जिल्ह्यातील भाळवणीत लाखो शौकिनांनी अनुभवला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या शर्यतीत बकासूर व महिब्या या बैलजोडीने रुस्तुम ए हिंद किताबावर नाव कोरत ‘थार’ जीप पटकावली. उत्कंठावर्धक शर्यतीत सात बैलजोड्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यामध्ये सदाशिव कदम मास्तर रेठरे, संभाजी आबा काले यांचा हिंदकेसरी महिब्या आणि मोहितशेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुसगावकरांचा हिंदकेसरी बकासुरने बाजी मारली.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजन
तुमच्या शहरातून (सांगली)
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यावतीने भाळवणी ता. खानापूर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोनज करण्यात आले होते. रविवारच्या सुटीमुळे सकाळपासून बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी मैदान गर्दीने फुलले होते. शर्यतीचा थरार आणि कोणती जोडी ‘थार’ जीप पटकावणार याची उत्सुकता ताणली होती. सकाळपासून शौकीन मैदानावर दाखल होते. दुपारच्या रणरणत्या उन्हातही शर्यतीचा आनंद व उत्सुकता चेहऱ्यावर दिसून येत होता.
बकासूर-महिब्याने पटकावली थार
या स्पर्धेत सदाशिव कदम मास्तर रेठरे, संभाजी आबा काले यांचा हिंदकेसरी महिब्या आणि मोहितशेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुसगावकरांचा हिंदकेसरी बकासुर यांनी बाजी मारली. पहिल्या क्रमांकाची थार गाडी त्यांना मिळाली. द्वितीय क्रमांक जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी, बबनदादा ल्हासुर्णे यांचा ‘रोमन’ आणि अधिक पैलवान कळंबी, सुमितशेठ भाडळे यांचा ‘शंभु’ यांनी मिळवला. तृतीय क्रमांक आई गावदेवी प्रसन्न, गुड्डी रतन म्हात्रे सांगाव डोंबिवली यांचा घरचा साज ‘मॅगी’ आणि ‘वजीर’ ने मिळवला.चतुर्थ क्रमांक हॉटेल निसर्ग गार्डन, सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंदकेसरी ‘सुंदर’ आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा आदत किंग ‘सुंदर’ याने मिळवला. पाचवा क्रमांक नियती भीमराव बुधकर रामूसवाडी करांचा ‘सूर्या’ आणि राहुलशेठ चौधरी वारजे पुणे करांचा ‘रायबान यांनी मिळवला.सहावा क्रमांक गोट्याभाई तडसर, दीपक शेठ चिरले, राहुलभाई पाटील यांचा ‘तेजा’ आणि आदई करांचा ‘बिरज्या’ यांनी मिळवला. सातवा क्रमांक जावेद मुल्ला तांबवे कराड यांचा आला.
तुम्हाला घरी कुत्रा पाळायचा आहे? मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ घ्या खबरदारी, Video
देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फौंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यातून व परराज्यातून शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. शर्यतीला जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धेत 27 गटात शर्यत घेण्यात आली. त्यातून उपांत्य सामन्यासाठी 32 बैलजोड्या पात्र ठरल्या. चिठ्ठी काढून सहा उपांत्य फेरीतील बैलगाड्या निश्चित केल्या. सायंकाळी उपांत्य फेरी सुरु झाली. रात्री उशिरा सात बैलजोड्यांची अंतिम फेरीतील चुरस पहायला मिळाली. स्पर्धेतील प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास ‘थार’ जीप बक्षिस, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी दुचाकी, सहाव्या क्रमांकासाठी ई बाईक दिली. तसेच इतरही अनेक बक्षिसे दिली. सहभागींना देखील मानाची गदा व गुलाल दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.