शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि २०(जिमाका):- शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन काम करीत आहे त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन पर लाभ योजना जाहीर केली होती. आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर लाभाची रक्कम जमा केली आहे संकटात असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पुष्पुगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व शेतक-यांच्या खात्यात ५० हजार रुपये लाभ जमा करण्यात आला. यावेळी श्री राठोड शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी आमदार सर्वश्री डॉक्टर संदीप धुर्वे, अशोक उइके, निलय नाईक ,नामदेवराव ससाने तसेच संजीव रेड्डी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
सन २०१७-१८, २०१८-१९, आणि सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिलेल्या मुदतित पूर्णतः परतफेड केलेल्या शेतक-यांना सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पिक कर्जाच्या मुद्दल रकमेवर ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.
आज जिल्ह्यातील मोजक्या शेतकरयांचा पालकमंत्री यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये झरी जामणी येथिल व्यंकट कुळसुंगे, यवतमाळ येथील प्रफुल्ल खंडाळकर, महागाव येथील अनिल देशमुख ,घाटंजी येथील नंदकिशोर वाटीले, उमरखेड येथील रामकृष्ण सोनटक्के, दिग्रस येथील पुष्पा चव्हाण, प्रल्हाद भगत ,मारेगाव येथील रवींद्र लेडांगे,राळेगाव येथील मोहन मेश्राम, बाभुळगाव येथील राजेश देशमुख या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर एक लाख १४ हजार ७६८ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणी करणासाठी अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ६५ हजार ३६४ लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्राप्त झाली आहे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमाणीकरण केलेल्या खातेदारांची संख्या ५७ हजार ७०६ राष्ट्रीयकृत बँकांचे ७६०६आणि ग्रामीण बँकेचे १४६९ शेतकऱ्यांचा समावेश आहे या सर्व शेतकऱ्यांच् या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर लाभाची रक्कम आज जमा करण्यात आली आहे.