राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना या समन्समधून देण्यात आले आहेत. पत्राचाळ कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आणि पर्ल ग्रुप प्रकरणात संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी समन्सची माहिती मिळताच संजय राऊतांनी एक ट्वीट केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या ट्वीटमधून त्यांनी ‘या मला अटक करा’ असं खुलं आव्हान दिलं आहे. तसेच, संजय राऊतांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
काय आहे संजय राऊत यांचं ट्विट ?
ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलंय की, “मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या… मला अटक करा! जय महाराष्ट्र!” धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.