Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच अवघ्या पाच दिवसांत अपघातांची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पाहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाला जेमतेम पाच दिवस उलटून गेले असून या महामार्गावरून वाहतूकही सुरू झाली आहे. पण या पाचच दिवसांत महामार्गावर पाच अपघात झालेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचं समोर येत आहे. नेमके हे अपघात का होतायत ? अपघाताची नेमकी कारणं काय आहेत, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
गेल्या रविवारी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 510 किमीच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. खरं तर या महामार्गाची रचना 150 किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण याठिकाणी 120 किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्यानं आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलोय, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, एकट्या बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत.
कधी आणि कसे झाले अपघात ?
- 12 डिसेंबर : एक मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, चालक जखमी.
- 12 डिसेंबर : एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली 20 फूट खोल खड्ड्यात पालटला, चालक आणि वाहक जखमी.
- 15 डिसेंबर : रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात, 11 महिन्याच्या बाळांसह तिघे गंभीर जखमी.
- 16 डिसेंबर : एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला. दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी.
- 16 डिसेंबर : मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात, चालक गंभीर जखमी.
नेमके हे अपघात का होतायत ?
समृद्धी महामार्ग हा सरळ रेषेत असल्यानं आणि वाहन चालवताना वाहन चालकाला ‘रोड हिप्नॉसिस’ म्हणजेच, तंद्री लागण्याची अवस्था निर्माण झाल्यानं चालकाला आपण किती वेगात जातोय, याचं भान राहत नसल्यानं अचानक झोप किंवा डुलकी लागू शकते. असे प्रकार या महामार्गाच्या रचनेमुळे होत आहेत. शिवाय अचानक महामार्गावर जंगली प्राणी येणं आणि त्यामुळे वाहनावरचं नियंत्रण सुटणं. यासारख्या अनेक कारणानं महामार्गावर अपघात होत आहेत.
खरं तर समृद्धी महामार्ग खुला करण्याआधी या मार्गावरून वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांची जनजागृती करणं आवश्यक होतं. कारण हा महामार्ग जागतिक दर्जाचं तंत्र वापरून तयार करण्यात आलं आहे. आपल्या देशातील वाहनं अशा मार्गावरून आणि अतिशय वेगानं धावण्यास समर्थ आहेत का ? वाहनांची बनावट एरोडायनामीक पद्धतीनं आहेत का ? एकंदरीतच वाहनांची टायरची परिस्थिती, त्यातील हवेचा दाब किती आणि कसा ठेवायचा ? याबाबतीत अजूनही आपल्या देशातील वाहन चालकांमध्ये पाहिजे तशी जागृती झालेली नाही. त्यामुळे यापुढे समृद्धी महामार्गावरून वाहन चालवतानाच काहीअंशी जनजागृती करणं महत्त्वाचं राहील.