वाशिम, प्रतिनिधी : बंजारा समाजाला चार राज्यांत चार प्रकारच्या सवलती मिळत असल्यामुळे यामध्ये समानता यावी आणि अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चार राज्यांतील रथ ११ फेब्रुवारीला पोहरादेवीत दाखल होणार आहे.
बंजारा समाजाचे खानपान, संस्कृती, एक रोटी-बेटीचा व्यवहार आहे. तरी पण कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती (एस.सी.), आंध्र प्रदेशात अनुसूचित जमाती (एस.टी.), महाराष्ट्रात विमुक्त जाती (व्ही.जे.एन.टी.) व मध्य प्रदेशात इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) अशा प्रकारच्या सवलती मिळत आहेत. १२ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर राज्याचे मुख्यमंत्री व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पोहरादेवीत विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी मान्यवरांचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून रथ ११ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे दाखल होणार आहे. समाजाच्या प्रमुख मागण्यांची दखल शासनाने घ्यावी म्हणून राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून कर्नाटक प्रांतातील सुर्गोडनकोपा (भायागड) येथून देवीभक्त शेखर महाराज रथचे नेतृत्व करीत आहेत. आंध्र प्रदेश राज्यातील सेवागड (गुती बेलारी) येथून देवीभक्त कबीरदास महाराज रथयात्रेचे नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्रात मुंबई येथील सांताक्रूझ येथून भक्तिधाम महंत जितेंद्र महाराज, तर मध्य प्रदेश राज्यात सक्तापर येथन निघणाऱ्या रथयात्रेचे नेतृत्व उमरीगडाचे महंत यशवंत महाराज करणार आहेत.
सुर्गोडनकोपा (भायागड) येथून रथयात्रेस सुरवात
कर्नाटक प्रांतातील सुगडनकोपा येथून २२ जानेवारीला धर्मगुरु संत बाबुसिंग महाराज यांनी रथाचे पूजन करून मंदिरात भोग भंडारा आरदास केल्यावर प्रसाद वाटप केला आणि त्यानंतर रथ पोहरादेवीकडे मार्गस्थ झाला. या रथामध्ये शेखर महाराज राहणार आहे. यावेळी संत जुगनू महाराज, डॉ.टी.सी. राठोड, प्रेम राठोड, जगनाथ गुरुजी यांच्यासह अनेक भाविक हजर होते. ही यात्रा २१ दिवस चालणार आहे.
प्रमुख मागण्या काय ?
■ मूळच्या भटक्या विमुक्त (अ व ब ) या प्रवर्गासाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर समकक्ष योजना सुरु करण्यात यावी.
■ अनेक वर्षांपासून राहत असलेल्या व कसत असलेल्या वन व इतर जमिनीचे मालकी हक्क व पट्टे देण्यात यावे.
■ वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळाचे भागभांडवल राज्य सरकारने स्वनिधीतून वाढवावे.
■ गोर बंजारा जमातीच्या बोली भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी बंजारा अकादमी स्थापन करण्यात यावी.
■ कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.
■ पोहरागड (ता. मानोरा) येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात यावी.