माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला.
Sharad Pawar PC : भाजप सरकारच्या काळात सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे, असे आम्ही वारंवार सांगत आहोत. गेल्या सहा महिने ते एक वर्षाच्या काळात भाजपने सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे. त्यातूनच आमच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र, न्यायदेवतेच्या माध्यमातून या प्रकरणांमध्ये काही तथ्य नव्हते, असे स्पष्ट झाले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली. न्यायदेवतेने या प्रकरणांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून भाजप सत्तेचा गैरवापर करत होता, हा मी केलेला आरोप स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत आणि आमचा आणखी एक सहकार्य अजूनही जेलमध्ये असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
नेमके प्रकरण काय ?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपी आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होताच देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. मात्र ईडीकडून त्यांना आधीच जामीन मंजूर झाला, तर आता सीबीआच्या केसमध्येही जामीन मंजूर झाला आहे.