Mumbai NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या दहा सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आमदार यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत मतदारसंघनिहाय पुन्हा चाचपणी होणार आहे.
येत्या पाच सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेलेले अनिल भाईदास पाटील यांच्यापेक्षा भाजपवरच ते टीकास्त्र सोडतील, अशी चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहे. जळगावमधील सभेनंतर मात्र, पवारांनी पुन्हा मुंबईत बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आमदार यांची येत्या दहा तारखेला शरद पवर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत शरद पवार हे मतदारसंघनिहाय पुन्हा चाचपणी करणार आहेत. त्या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. कारण, त्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी ही राज्यातील महत्त्वाच्या जागांवर सप्टेंबर महिना संपेपर्यंत चर्चा पूर्ण करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील तीन पक्षांत राज्यातील जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील सर्व जागांबाबतचा अहवाल इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीकडे दिला जाणार आहे.
दरम्यान, मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीतच देशातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, राज्य पातळीवर चर्चा होऊन त्याबाबतचा अहवाल इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीकडे देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.