द्राक्ष उत्पादक शेतकरी हे एक ना अनेक अडचणींचा सामना गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ आणि योग्य उपाययोजना याबाबत मार्गदर्शन होण्याची नितांत गरज असतानाच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी शेती व्यवसायामध्ये कृषी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान राहिल्याचे सांगितले तर वाईन विक्री धोरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्यच होते पण काही कारणास्तव ते अंमलात आले नाही. त्यामुळे उलट शेतकऱ्यांचे नुकासानच होत असल्याचे पवार म्हणाले आहे. काळाच्या ओघात होणारे बदल स्विकारणे गरजेचे आहे. देशात द्राक्ष उत्पादनाच्या तुलनेत केवळ 8 टक्के द्राक्षांची निर्यात होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वाईन विक्रीचे धोरण महत्वाचे ठरले असते असेही पवार म्हणाले आहेत. शिवाय द्राक्ष परिषदेमध्ये शेतकऱ्यांना विविध शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अडचणीतच आहे. गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वीच अवकाळी पावसाची अवकृपा राहिलेली आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी बागाही मोडीत काढल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने आयोजित केलेल्या परिषदेचा खऱ्या अर्थाने या उत्पादकांना फायदा होईल का हे पहावे लागणार आहे. 8 टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर 92 टक्के द्राक्ष भारतीय बाजारपेठेत विक्री होतात. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल, आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूर परिषदेत निघाला होता.
शरद पवार यांना शेतीविषयी आवड तर आहेच पण शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीवही. त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना आणि उद्देश तर सांगितला पण उत्पादनाबरोबर बाजारपेठही कशी गरजेचे आहे हे पटवून सांगितले. शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे घटक हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. शेतीचा ही ते भाग आहेत. त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती सुरुये. असे देशात जवळपास 5 हजार शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळं विज्ञान आणि शेतीचा समतोल राखला गेला. वाईन विक्रीचं धोरण गेल्या राज्य सरकारने आणलं, हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही. प्रश्न खूप आहेत. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे आश्वासनही पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे.
द्राक्ष उत्पादनात वाढ आणि अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब या बाबींची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावी यासाठीच परिषदेचे आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष पिकातून उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघालेला नाही. त्यामुळे या परिषदेत शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन उत्पादन वाढीसाठी फायद्याचे ठरेल असा विश्वास आहे.