केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शेतकरी बांधवाना मदत करण्यासाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली होती. तशी कर्जमाफी किंवा तेवढी मदत करण्याची भूमिका आजपर्यंत मोदी सरकारने घेतली नाही.उलट शेतकरी विरोधी काळे कायदे आणून अनेक शेतकरी शहीद करण्याचे,मोदी सरकारच्या मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांवर गाडी घालून चिरडण्याचे पापच केलं त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून शेती विषयक निर्णय देखील त्यांच्या उद्योगपती मित्रांना लाभदायी कसे होतील असे प्रयत्न करत असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
आपल्या राज्यात महापूर,अतिवृष्टी सारखे संकट,कोरोना सारखी महामारी आली या काळात शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती,मात्र मदत तर केलीच नाही उलट राज्याचे जीएसटी पोटी असलेली थकबाकी देखील मोदी सरकारने राज्याला दिली नव्हती.कारण त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होते म्हणून राजकीय कुरघोडी करण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही तर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात मदत केली.
अशीच मदत कोरोनात स्वकीय गमावलेल्या कुटुंबाना देखील महाविकास आघाडी सरकारने केली होती, केंद्राने प्रत्येक कुटुंबाना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत करावी अशी अपेक्षा असताना देखील केंद्राने काहीच मदत केली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी या भाजप सरकारवर प्रचंड नाराज असून राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेतून वाट मोकळी करून देतील अशी अपेक्षा आहे.