एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले, राज्यात शिंदेपर्व सुरु झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अखेर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व बंडखोर आमदार गोव्यात होते. त्यांनी शपथविधी लाईव्ह पाहिला. पण हे सर्व आमदार मुंबईत कधी परतणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज (शनिवारी) मुंबईत परतणार असल्याचं सांगितलं.
शपथविधीनंतरपासूनच नवं सरकार अॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बैठका आटोपल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता गोव्याकडे निघाले आणि पहाटे 4 वाजता पणजीत पोहोचले. गेले तीन दिवस गोव्यात मुक्कामाला असलेल्या 50 समर्थक आमदारांना घेऊन शिंदे आज दुपारनंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत. उद्यापासून विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी शिंदे समर्थक आमदार आजच मुंबईत पोहोचतील. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री गोवा गाठलं होतं. काल दुपारनंतर ते मुंबईत परतले. संध्याकाळी बैठका आटोपून ते पुन्हा गोव्याला रवाना झालेत.