पुणे : पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) नेते, माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
निलेश माझिरे हे बाळासाहेबांची शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसेमधून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्ह्याच्या कामगार सेनेची जबाबदारी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नी सुप्रिया निलेश माझिरे यांनी गुरुवारी सकाळी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुप्रिया यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता, हे अजून कळलेलं नाही. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. निलेश माझिरे हे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते. पण काही दिवसांपूर्वी माझिरे यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या ४०० कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला होता.