शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त आठच खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारसुद्धा बंडाच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याआधी शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत एकनाथ शिंदेंचा वेगळा गट तयार केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. आता त्यानंतर शिवसेना पक्षाला आणखी मोठा धक्का मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आज शिवसेना खासदारांची बाठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. खासदार राहूल शेवाळे, राजेंद्र गावित आणि इतर काही खासदार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देणार का? हाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.