अवघ्या २१ वर्षांची सांगली जिल्ह्यातील यशोधरा शिंदे जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच थेट ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी आली होती आणि ‘वड्डी’ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून देखील आली. या निवडणुकीत तिच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला, सर्व जागांवर उमेदवार देखील निवडून आले.
“फॉरेन रिटर्न” म्हणून तिला माध्यमांनी ओळख दिली असली तरी परदेशाप्रमाणेच शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत, या विचारातूनच तिने थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. शाळेत शेकड्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी असताना सगळ्यांत मिळून एकच कॉमन टॉयलेट का ? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत ? परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत ? परदेशात पाहिलं तसंचं गाव आणि समाज माझ्याही गावात बनला पाहिजे, हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तिने निवडणूक लढवली. विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे यावर तिने प्रचारात जोर दिला होता.
मला वाटतं प्रत्येक गावागावात प्रगतशील विचार ठेवणाऱ्या अनेक युवती आणि महिला आहेत. त्या जर पुढे आल्या तर येणाऱ्या काळात नक्कीच राजकारणासह समाजाचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. मुलींनी पुढे आले पाहिजे, इतर क्षेत्राबरोबरच समाजकारण, राजकारणात येवून व्यवस्था परिवर्तनासाठी लढले पाहिजे.
यापूर्वी देखील अनेक महिलांनी देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहचत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात अग्रक्रमाने आपण माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे नाव घेऊ शकतो.
शिवानी विजय वडेट्टीवार
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस