नाशिक – ता. २७
नाशिक २०२२ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नाशिक महानगरपालिकेसह सर्वत्र शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित करणे हेच प्रमुख लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन पक्षविस्ताराच्यादृष्टीनेच शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कंबर कसावी, असे आवाहन शिवसंपर्क अभियान प्रमुख संजय ढमाल यांनी केले.
शिवसंपर्क अभियानांतर्गत संपूर्ण नाशिक महानगर पिंजून काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि या अभियानाच्या संपर्कप्रमुखांची मोठी टीम नाशकात दाखल झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ सिडकोपासून करण्यात आला त्यावेळी सावतानगर येथे आयोजित बैठकीत, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना श्री संजय ढमाल बोलत होते.
व्यासपीठावर अभियानप्रमुख शरद गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महिला आघाडी संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, नाशिक पश्चिम विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी, शोभा गटकळ, हर्षाताई बडगुजर, नाना पाटील, युवा नेते दीपक बडगुजर, सचिन राणे, शीतल भामरे, डॉ.वृषाली सोनवणे, द्वारका गोसावी, अलका गायकवाड, मंदाकिनी जाधव, बाळकृष्ण शिरसाठ,नीलेश साळुंखे, पवन मटाले, अंकुश शेवाळे,सुयश पाटील आदी होते.
राज्यात शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याने यावेळी शिवसेनेला अनुकुल वातावरण आहे. त्याचा लाभ उचलून पक्षाचे विचार आमजनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सर्वस्व पणास लावावे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे शिवसेनेची एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे.सर्वत्र आपणास शिवसेनेचा भगवा ध्वज फाडकवायचाच आहे अशी खूणगाठ सर्वानी पक्की मनाशी बांधावी,असे संपर्क अभियान प्रमुख शरद गिते आपल्या भाषणात म्हणाले.
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही यावेळी मार्गदर्शन करतांना महानगरात शिवसेनेचे किती व्यापक जाळे विणले गेले याची माहिती त्यांनी विशद केली.पक्षापापासून दूर गेलेले पुन्हा पक्षात आले तसेच अन्य पक्षांतील अनेक दिग्गज नेतेही शिवसेनेत दाखल झाले आणि आणखी अनेक जण आमच्याशी संपर्क साधून असल्याने महानगरात शिवसेनेची ताकद वाढली आहे.भाजपाने गेल्या 5 वर्षांत नाशिक महापालिकेत मनमानीपणे कारभार करून जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे लोक शिवसेनेकडे मोठ्या आशेने बघत असून यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीत 100प्लस उमेदवार निवडून आणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकहाती सत्तेचे स्वप्न साकार करणारच असा विश्वास बडगुजर यांनी व्यक्त केला.प्रारंभी दीपक बडगुजर यांच्याहस्ते संजय ढमाल आणि शरद गिते यांचा सत्कार करण्यात आला.