चंद्रपूर जिल्ह्यात ९ पैकी ७ बाजार समित्यांवर काँग्रेसप्रणित पॅनलचा एकतर्फी विजय
Chandrapur : देशात व राज्यातील वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात असून शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना आज त्यांची खरी जागा दाखवली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भाजपला नाकारत शेतकरी हा पूर्णपणे भाजपपासून दूर गेल्याचे आजच्या बाजार समितीतील निकालामुळे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिलेली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांसोबत चंद्रपुरातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल (APMC Elections Result) जाहीर झाले असून या सर्व समित्यांवर काँग्रेसप्रणित पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. चंद्रपुरातील ९ पैकी तब्बल ७ बाजार समित्यांवर काँग्रेसप्रणित पॅनलचा एकतर्फी विजय झालेला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांची निवडणूक ही माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आहेत.
त्याचबरोबर माजी मंत्री वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रम्हपुरी (Bramhapuri) मतदारसंघातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही बाजार समितीवर मोठा विजय मिळवला आहे. ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bramhapuri APMC) निवडणुकीत आ. वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला असून विरोधी पॅनलला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. तर सिंदेवाही बाजार समितीत (Sindewahi APMC) शेतकरी विकास पॅनलने १८ जागांवर विजय मिळवत निर्निर्वाद वर्चस्व राखलंय. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, अमरावती यासह विदर्भातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्येही काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या पॅनल विजयी झाली आहे. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजयी झालेले सर्व नवनिर्वाचित संचालक आगामी काळात शेतकरी हितासाठी प्रामाणिकपणे काम करून शेतकरी बांधवांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील.