तीनशे रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया; डॉ. लहानेंचेही मार्गदर्शन
यवतमाळ, ता. ३० : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित शिबिरात तीनशे रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. शिवाय वेळेवर नियमित औषधी घेण्याचे आवाहनही केले.
अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे असतात. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ.तात्याराव लहाने आपल्या जिल्ह्यात आलेत.
आपण कुणीही देव पाहिला नाही मात्र, तात्याराव लहाने आणि रागिणी पारेख यांच्या रूपात आज देव पाहायला मिळाला, असे उद्गार अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.यावेळी डॉ. तात्याराव लहाने, डॉ.रागिणी पारेख, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले की, डॉ. तात्याराव लहाने यांच्या हातात जादू आहे. त्यांनी आतापर्यंत लाखो शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवी दृष्टी दिली आहे. मागील वर्षीसुद्धा आपल्या जिल्ह्यात एक हजार शस्त्रक्रिया त्यांनी केल्या होत्या. यावर्षी शिबिरासाठी पाठपुरावा करून त्यांना आमंत्रित केले. त्यांच्यासारख्या निष्णात डॉक्टरांकडून आपल्याला सेवा मिळत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची व भाग्याची बाब आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सर्व आजारांसाठी तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.