पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरती; हजारो भाविकांनी घेतले मुंगसाजी माऊलींचे दर्शन
Yavatmal : दारव्हा (Darvha) तालुक्यातील धामणगाव (देव) (Dhamangaon) येथे रविवारी (ता. २६) मुंगसाजी महाराज (Mungsaji Maharaj) पुण्यतिथी महोत्सव पार पडला. शेकडो पालख्यांसह भाविकांची मांदियाळी धामणगावात दाखल झाली. पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे आदींच्या उपस्थितीत अभिषेक, पूजन व महाआरती केली. माऊलींच्या या सोहळ्यासाठी लगतच्या जिल्ह्यासह तालुक्यातून शेकडो दिंड्या धामणगावात दाखल झाल्या. या पावन पर्वावर हजारो भाविकांनी गर्दी करीत दर्शनाचा लाभ घेतला.
धामणगाव (Dhamangaon) येथे दरवर्षी विविध मुहूर्तावर माऊलीचा उत्सव साजरा केला जातो, त्यात पुण्यतिथी सोहळा एक होय. यावर्षी मुंगसाजी महाराज (Mungsaji Maharaj) पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी धामणगाव येथे मुक्कामी राहून रविवारी सकाळी मुंगसाजी महाराज यांचा अभिषेक, पूजन व महाआरती केली. यावेळी जिल्हा परिषदेचे (Zila Parishad) माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, गावच्या सरपंच वनिता जगदीश जाधव यांच्यासह पालख्या मुख्य दरबारातून निघाल्या. या सोहळ्याला गावकरी व भाविक उपस्थित होते. शेकडो दिंड्यांसह भाविक मिरवणुकीत त्यानंतर माऊलीचा पालखी सोहळा पार पडला. दुपारी काल्याचे कीर्तन, देवाचा रथ व बाहेरून आलेल्या शेकडो महाप्रसादासह विविध कार्यक्रम झाले. माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक पायीवारीने धामणगावात दाखल झाले होते. भाविकांना सेवा, सुविधा पुरविण्याकरिता गावकरी, संस्थान, मुंगसाजी माऊली ग्रुप ग्रामपंचायत, शाळा, ग्रामसेवक संघटना, नगरपालिका, पोलिस, महसूल प्रशासन, राजकीय, सामाजिक कार्यकत्यांनी पुढाकार घेतला.
तपस्वी मुंगसाजीची कीर्ती सर्वत्र
धामणगावच्या (Dhamangaon) अंभोरे परिवारात माता गमाई व विक्रमजी यांना जन्माष्टमीच्या पर्वावर पुत्ररत्न झाले. सदर दाम्पत्याची तुळजापूरच्या आई भवानीवर श्रद्धा असल्याने पुत्राचे नाव तुळजाजी ठेवले. तुळजाजीचे मन संसारात रमत नसल्याने ते रानावनात भटकत. त्यांच्या अंगाखांद्यावर वैरत्व विसरून साप व मुंगूस खेळत होती. त्यामुळे लोक त्यांना ‘मुंगसाजी’ (Mungsaji Maharaj) म्हणू लागले. तपस्वी मुंगसाजीची कीर्ती विदर्भासह (Vidharbha) राज्यभर सर्वदूर पसरली. काल पुण्यतिथीच्या पावन पर्वावर भाविकांनी धामणगावात दर्शनासाठी रांग लावली होती.
चोख पोलिस बंदोबस्त
माऊलीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जागर रविवारी धामणगावात (Dhamangaon) पाहायला मिळाला. सोबत शेकडो पालख्या, भाविकांची शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने यांची पार्किंग, हजारो भाविकांची गर्दी आदींचा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश मस्के यांच्याकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला.