Tamil Nadu : तामिळनाडूच्या राजकारणात सोमवारी एक विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली. सभागृहातील अभिभाषणानंतर राज्यपाल आर.एन.रवी (Tamil Nadu Governor RN Ravi) सभागृहाबाहेर गेले. सत्ताधाऱ्यांकडून दिलेल्या भाषणातील काही भाग वगळून राज्यपालांनी अभिभाषणाचे वाचन केल्याने सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राज्यपाल आणि सत्ताधारी द्रमुक यांच्यातील वाद आणखी विकोपाला गेला.
सत्ताधारी पक्षाने तयार करून दिलेल्या भाषणातील काही भाग राज्यपालांनी दुर्लक्षित केल्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन (MK Stalin) यांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ठराव मांडला आणि तो मंजूर करून घेतला. या घटनेनंतर राज्यपाल तात्काळ सभागृहाबाहेर पडले. राज्यपालांनी भाषणातील भाग वगळणे आणि सभागृह सोडून जाण्याचा प्रकार विधानसभेच्या इतिहासात प्रथमच घडलाय.
राज्यपालांनी भाषणादरम्यान जे शब्द वगळले त्यात ‘द्रविड मॉडेल’ चा देखील समावेश होता. त्यामुळे भाषण संपताच सत्ताधारी द्रमुक आणि मित्रपक्षांच्या आमदारांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. भाषण सुरू होताच राज्यपालांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमिळ भाषेत केले. यावेळी त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह ‘पोंगल’ कापणीच्या सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदारांनी ‘तामिळनाडू वाढगवे’ (तामिळनाडू अमर रहे) आणि ‘अंगलनाडू तामिळनाडू’ (आमची भूमी तामिळनाडू) च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तमिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष डीएमकेच्या मित्रपक्षांपैकी काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एम) च्या आमदारांनी राज्यपालांच्या भाषणानंतर घोषणाबाजी केली. मात्र, काही वेळाने ही घोषणाबाजी थांबली. त्यानंतर राज्यपाल सभागृहातून बाहेर पडले.
भाजपकडून टीका
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. राज्यपालांसाठी तयार केलेल्या भाषणासाठी सरकारने राजभवनाची संमती घेतली नसल्याचा आरोप भाजप आमदार वनथी श्रीनिवासन यांनी केलाय. श्रीनिवासन यांनी राज्यपालांचा बचाव करताना सत्ताधारी द्रमुकवर जोरदार निशाणा साधलाय.
राज्यपाल जरी आमच्या द्रविड आदर्श तत्त्वांच्या विरोधात वागत असले तरी आम्ही विधानसभेची परंपरा पाळली आणि भाषण संपेपर्यंत आमचा निषेध दर्शविला नाही. राज्यपालांनी केवळ आमच्याच नव्हे तर सरकारच्या तत्त्वांच्या विरोधात कृत्य केले आहे. त्यांनी भाषणाची पूर्ण प्रत वाचली नाही. विधानसभेचा नियम 17 शिथिल करून मी इंग्रजीत छापलेले भाषण आणि सभापतींनी वाचलेले तामिळ प्रत विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये घेण्याची विनंती करतो. राज्यपालांच्या भाषणातील जे भाग भाषणाच्या प्रतीचा भाग नव्हता तो देखील न काढण्याचाही मी प्रस्ताव मांडतो, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले आहे.