लक्ष्मी पूजनाला सगळीकडे पुरणाचं, गोडाचं नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजापूरात घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहाराचं नैवेद्य दाखवला जातो. यामागचं कारण तुम्हाला माहित आहे? याविषयी तुळजापूर इथल्या मंदिराचे महंत योगी मावजीनाथ यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधल्यावर त्यांनी यामागची कथा सांगितली.
केवळ दिवाळीच नव्हे तर दसऱ्यालाही असतो मांसाहारी नैवेद्य
महिशासुराचा वध कोणत्याही पुरूष देवतेपासून होणार नव्हता. म्हणून सर्व देवांनी मिळून शक्तीला आवाहन केलं आणि त्यातून तुळजा भवानी प्रकट झाली. महिशासुराशी युध्द करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेंव्ह तो शरण आला.
माझं गर्व हरण झालं आहे असं म्हणून शेवटची इच्छा त्याने प्रकट केली की, माझा भोग मला चढवला जावा. म्हणून दसऱ्याला देवीला नॉनव्हेजच नैवेद्य करून तो नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो. पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. देवीला परत गोडाचा नैवेद्य असतोच. पण घरोघरी मांसाहारी नैवेद्य बनतो.
दिवाळीची कथा
नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवी पाठवते. तिथे आल्यावर तो देवीनं त्याला का पाठवलं ते विसरला आणि देवीनं रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात. त्यावेळी देवीची त्यांनी क्षमा मागीतली.
मग देवी तिथं विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्याजवळ राहिले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. आणि देवीला पण तोच नैवेद्य असतो. आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य होतो.
दिंडोळी प्रथा
एका मोठ्या केळीच्या खांबाला कापड गुंडाळून भव्य ज्योत पेटवली जाते. तिची देवीला प्रदक्षिणा असते. त्याला दिंडोळी म्हणतात. काळ भैरवनाथाच्या मंदिरातून दिंडोळी घेऊन ती देवीच्या सिंहासनाला स्पर्श करतात मग प्रदक्षिणा घालून ती मंदिरा मागच्या अहिल्यादेवी विहीरीत शांत केली जाते. या प्रदक्षिणेदरम्यान स्थानिक नागरिक आनंद व्यक्त करत फटाके फोडतात.