रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 100 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. पण अजूनही युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाच्या हल्ल्याला युक्रेन चोख प्रत्युत्तर देत आहे. या दरम्यान युरोपीय संघाच्या प्रमुख युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचल्या आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या भेटीसाठी शनिवारी कीव्हमध्ये पोहोचल्या आहेत. युक्रेनची पुनर्बांधणी आणि युरोपियन संघाच्या सदस्यत्वाच्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीबाबत अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
युरोपियन संघाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेयन यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या कामाचा आणि युरोपीय संघाच्या सदस्यत्वासाठी महत्त्वाच्या कामांचा आढावा घेणार आहे. युक्रेन सरकार युरोपियन संघांमध्ये सामील होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही आपल्या देशाला युरोपियन संघाचे सदस्यत्व देण्याचं आवाहन केलं आहे. झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे केलेल्या जनसंबोधनात सांगितलं की युरोपियन संघाने युक्रेनला सदस्याचा दर्जा देण्याच्या दिशेनं वेगवान पाऊल उचलावी. युरोपियन संघानं आपलं वचन पाळलं पाहिजे.
युरोपियन संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत मी युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या कामाचा आढावा घेणार आहे. तसेच युक्रेनने युरोपियन संघात सामील होण्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेईन.’ याआधी युरोपियन संघाच्या अध्यक्षांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आणि जागतिक अन्न संकटावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.